जामनेर ( प्रतिनिधी) – तालुक्यात सोमवारी जोरदार वादळी पावसामुळे नुकसान झाले यात १८ गावांमधील १८० घरांची पत्रे उडून गेली काही दुकानांमध्ये पाणी शिरले शेती शिवारातही मोठी हानी झाली सामरोदसह परिसराचा संपर्क जगाशी तुटला या आपत्तीत एक तरूण बंधार्यातील पाण्यात वाहून गेला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज ओझर व हिंगणे भागात नुकसान झालेल्या परिस्थितीची शेतावर जाऊन माहिती घेतली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की कालच मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला असून नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे या दौऱ्यात आ गिरीश महाजन , शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील , राष्ट्रवादीचे संजय गरुड , काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील, शिवसेनेचे गणेश पांढरे , जामनेर शहरप्रमुख अतुल सोनवणे , काँग्रेसचे शंकर राजपूत, दीपकसिंग राजपूत, डी के पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील , जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे , गट विकास अधिकारी ज्योती कड यांच्यासह शासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टग्रस्त भागांसाठी कोरोनाच्या अतिरिक्त १७ हजार लसी देण्यात आल्या असून आवश्यक औषधी आणि फवारणीची तरतूद करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ना. पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेने अतिवृष्टीनंतरच्या रोगराईला आळा घालण्यासाठी काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महसूल प्रशासनाने दिवसभर नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज एका विवरणपत्राच्या माध्यमातून जाहीर केला आहे. या विवरणानुसार जामनेर तालुक्यातील १७ गावांमध्ये हानी झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. यात हिंगणे येथे सुमारे २० घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ओखर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी ४० घरांची पत्रे उडाली आहेत. रामपूर येथे १० तर लहासर येथे १५ घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ढालशिंगी येथे चार घरांची अंशत: पडझड झाली असून जुनोने येथे एका घराची भिंत कोसळली आहे. तळेगाव आणि पहूर येथे अनुक्रमे ९ आणि ८ दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. टाकळी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाची पत्रे उडाली आहेत. या सर्व गावांमध्ये सुमारे १३० घरांची पत्रे उडाल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. नांद्रा हवेली गावातील एका संपूर्ण गल्लीत पूराचे पाणी शिरले आहे.

मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी शिवारातील पिकांचे वादळ आणि मुसळधार पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने नमूद केला आहे.
सामरोद, ओझर, टाकरखेडा गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. फत्तेपूर ते तळेगावच्या दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक देखील बंद आहे. तोंडापूर येथील खडकी नदीच्या बंधार्यातील पाण्यात शेख मुसा शेख साहीर (वय ३० वर्षे वय) हा तरूण वाहून गेला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज शेख मुसा शेख साहेबच्या घरी सांत्वन भेट दिली तहसीलदार अरुण शेवाळे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील, राष्ट्रवादी नेते संजय गरुड गणेश पांढरे , साडुमामा गुरव व सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







