जळगाव ( प्रतिनिधी ) – मध्यप्रदेश, विदर्भासह जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तापी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. दुसरीकडे, पूर्णा नदीला देखील पूर आल्याने भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

सध्या धरणातून 82 हजार 178 क्यूसेक्स इतक्या वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाचोरा तालुक्यातील नेरी येथील सचिन भगवान पाटील हा 25 वर्षीय युवक गडद नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. नदीपात्रात त्याचा शोध घेतला जात आहे. परंतु, तो मिळून आलेला नाही. सचिन आज सकाळी त्याच्या 2 मित्रांसोबत नदीच्या पात्रात पोहायला गेला होता. त्याने पाण्यात उडी मारली पण तो नंतर बाहेर आलाच नाही, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.







