भुसावळ ( प्रतिनिधी ) – पोलिसांच्या प्रस्तावानंतर ३२ उपद्रवी गुन्हेगारांवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व तालुक्यातून ९ ते २१ सप्टेंबर या काळात वास्तव्यबंदीचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले आहे. यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आता नव्याने २१ जणांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. गणेशोत्सवास 10 सप्टेंबरपासून सुरूवात होत असून उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही गोंधळ करू नये, शहरबंदी, तालुका बंदीच्या आदेशाचे पालन न करणार्यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात शांतता राहण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहर व तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीतील उपद्रवींविरोधात कारवाईसाठी प्रांताधिकारी यांच्याकडे शहरबंदीचे 35 प्रस्ताव सादर केले होते. मंगळवारी 32 जणांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे उपअधीक्षक वाघचौरे यांनी सांगितले.
प्रांताधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली आहे. बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे व तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबविली जात आहे.
उस्मान गवळी, अनिल पारधी, संतोष मोरे, कीशोर चौधरी, मुकूंदा लोहार, रवींद्र मोरे, खलील गवळी, विक्की देवपुजे, अक्षय सोनवणे, भूषण उर्फ टक्या मोरे, सूरज चंडाले. राकेशबार्हे, धीरज चंडाले, प्रमोद धांडे, आकाश देवरे, रत्नपाल नरवाडे, जितेंद्र भालेराव, लक्ष्मण मोरे, गौरव नाले, सुभान गवळी यांच्यासह 32 जणांचा हद्दपार केलेल्यांमध्ये समावेश आहे.