जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात एकीकडे वेगाने लसीकरण सुरू असतांना आज दिवसभरात जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रूग्णांची संख्या ही विलक्षण प्रमाणात कमी झालेली आहे. गेल्या आठवड्यात ती एक-दोन असे रूग्ण आढळून येत होते. गत चोवीस तासांमध्ये तर जिल्ह्यात एकही पेशंट आढळून आलेला नाही. यामुळे आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, आजच तीन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांनी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी नागरिकांनी गाफील न राहता सर्व नियमांचे पालन करावे ही अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.