बिजींग (वृत्तसंस्था) – वुहान मधील करोनामुळे मरण पावलेल्यांची आकडेवारी काही प्रमाणात चुकली होती अशी जणू कबुलीच देत चीनने आता मृतांबाबत सुधारीत आकडा जारी केला आहे. त्यानुसार आता वुहान मध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 4632 इतकी असल्याची माहिती चीन कडून देण्यात आली आहे. त्यांच्या या सुधारीत आकडेवारीनुसार वुहान मध्ये करोनाची लागण झालेल्यांची संख्या 82 हजार 692 इतकी होती व मृतांची संख्या 4632 इतकी आहे. चीनचे या आधीचे आकडे चुकीचे आहेत त्यांनी खरी माहिती दडवून ठेवली आहे असा आरोप अमेरिकेने सातत्याने केला होता. हा विषाणु चीनच्या हुनान येथील सीफूड मार्केट मधूनच पसरला असाही अमेरिकेचा आरोप आहे तो आरोप मात्र त्यांनी अजून मान्य केलेला नाही. मृतांच्या नोंदणीत ही चूक कशी झाली या विषयी वुहान म्युनिसिपाल्टीने म्हटले आहे की आधी काही ठिकाणी झालेल्या मृतांची नेमकी आकडेवारी नोंदवली गेली नव्हती. तसेच काही रूग्ण घरातच उपचार न होता मरण पावले आहेत. त्यामुळे हा आकडा वाढला आहे. रूग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल झाल्याने तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रूग्णांचे प्राण वाचवण्यास प्राधान्य दिले त्यामुळे त्यांना मृतांची आकडे नोंद करण्याचे भान राहिले नाही त्यातूनही ही आकडेवारी चुकली आहे. अनेक ठिकाणची माहिती वेळेवर मिळू शकली नाही त्यामुळे ती मुख्य नोंदीत घेण्याचे राहून गेले होते असेही कारण त्यांनी दिले आहे.