पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांच्या नियुक्त्यांबाबत आमदार चिमणराव पाटील यांनी घेतलेल्या झाडाझडतीनंतर अखेर तालुक्यात आठ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पारोळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांसंदर्भातील शेतकरी व पशुधनधारकांनी आमदार चिमणराव पाटील यांचेकडे तक्रारींचा पाढाच वाचला होता. याची तात्काळ दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांनी उंदिरखेडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला दिनांक २१ जुलै रोजी अचानक भेट दिली असता दवाखान्यात एकही डाक्टर किंवा कर्मचारी आढळुन आला नाही. या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी दवाखान्याबाबतीत चांगल्याच तक्रारी केल्या. त्याचक्षणी आमदार चिमणराव पाटील यांनी तालुक्याचा पशुवैद्यकीय दवाखाना गाठला.
यावेळी दवाखान्यात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते. शेतकरी व पशुधनधारकांच्या तक्रारी व प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतरची परिस्थिती पाहता आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच तालुक्यातील पळासखेडे बु, उंदिरखेडे, मोंढाळे, सावखेडा, बोळे, इंधवे, आडगांव या गावांमध्ये त्वरीत पशुवैद्यकीय पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात सुचना केल्या. याचा आमदार चिमणराव पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी दिनांक २६ आगस्ट रोजीच्या पत्रान्वये तालुक्यातील उपरोक्त ८ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांच्या नियुक्तिचे आदेश देण्यात आले आहेत.







