चाळीसगाव (प्रतिनिधी) – आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या “शिवनेरी” निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने विकासकामांचे उदघाटन व भाषणबाजी टाळत “देवादिकांचे आशिर्वाद” व शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्वांची “आपुलकीची भेट” घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
चाळीसगाव तालुक्याचे दैवत पाटणादेवी येथील चंडिकामाता, शहराच्या ग्रामदैवत आनंदा माता व त्यांचे मूळगावी कुलदैवत शाकंभरी मातेचे सपत्नीक दर्शन घेऊन चाळीसगाव वासीयांच्या सुख-समाधानासाठी साकडे घातले.
३८ वर्षाच्या आयुष्यात अनेकदा शून्य होण्याची स्थिती ओढावली. वयाच्या ३६ व्या वर्षी चाळीसगावकरांच्या अतूट विश्वासाने विधानसभेत पोहचलो. धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नाही. ओंजळ भरलेली असेल तर त्यातील जमिनीवर सांडण्याआधी इतरांनाही दिले पाहिजे हीच भावना ठेवून आजपर्यंत काम केले असा हृदय संवाद आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे उपस्थितांशी साधला.
वाढदिवसाच्या दिवशी सकाळी १० वाजता माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी त्यांचे निवासस्थानी भेट देत अभीष्टचिंतन करीत शुभेच्छा दिल्या. निवासस्थानी संध्याकाळी ५ वाजेपासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. चाळीसगाव शहरातील कार्यकर्ते यांनी ढोल ताशे वाजवत आपल्या लाडक्या आमदार मंगेश चव्हाण हे येणाऱ्या प्रत्येकाला भेटीसाठी वेळ देत त्यांच्याशी संवाद साधत होते तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर व ग्रामीण सरचिटणीस, लोकप्रतिनिधी हे येणाऱ्या सर्वांचे स्वागत करत होते तर सौ.प्रतिभा चव्हाण व सर्व चव्हाण कुटुंबातील सदस्य हे येणाऱ्या सर्वाची विचारपूस करत आग्रहाने स्वरूची भोजनाची व्यवस्था करत होते.









