
जळगाव जिल्ह्यात येणार २० आमदार सदस्य; उद्या सकाळी आढावा समितीची बैठक
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध विभागांची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती उद्या दिनांक २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात दौरा करणार आहे. याबाबतची सर्व विभागांच्या प्रमुखांची आढावा समितीची बैठक मंगळवारी २४ रोजी सकाळी ९.३० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलवण्यात आली आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंदाज समितीचे अध्यक्ष रणजित कांबळे हे राहतील. प्रसंगी जिल्ह्यातील ३० विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. समिती जिल्ह्यामध्ये विविध विभागाचे प्रकल्प, कामे तसेच योजनांच्या कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.
यात महसूल विभाग, वन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महानगरपालिका, नगरपंचायती, जलसंपदा, मत्स्यव्यवसाय, ग्राम विकास, गृह, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, पर्यटन विभाग, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आदी विभागांच्या प्रकल्पांना आणि योजनांना भेटी देणार आहेत.
या आमदार सदस्यांची राहणार उपस्थिती
अंदाज समितीचे अध्यक्ष आ.रणजित कांबळे यांच्यासह 20 आमदार सदस्य उपस्थित राहणार आहेत. यामध्ये चिमणराव पाटील, सदा सरवणकर, संजय गायकवाड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश सोळंके, माणिकराव कोकाटे, अमित झनक, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, रईस शेख, विलास पोतनीस, दुष्यंत चतुर्वेदी, वजाहत मिर्झा, निलय नाईक, बळवंत वानखडे, कपिल पाटील, विक्रम काळे आणि विनायकराव मेटे हे उपस्थित राहतील. त्यांच्यासह मंत्रालयातील तीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.







