जळगाव;- कोरोनाचा पहिला रूग्ण बरा होऊन घरी काय परतला आणि जळगावकर अगदी सामन्य परिस्थितीप्रमाणे वावरत असून रस्त्यांवर वाहने सुसाट असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम बिनधास्त पायदळी तुडवले जात असून अनेक रस्ते वाहनांनी पूर्ण खचाखच भरल्याचे चित्र गुरूवारीही कायम होते.
कोरोना संसर्ग झालेला मेहरूण परिसरातील पहिल्या रूग्णाला बुधवारी डिस्चार्ज मिळाला. त्याच्या संपर्कातील सर्व निगेटीव्ह आले आहेत. दुसर्या रूग्णाचा मृत्यू झाला त्या परिसरातील सर्व निगेटीव्ह आल्याने जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केली आहे. मात्र, लॉकडाऊन पाळावे असे आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. अशा स्थितीत जळगावकर मात्र, या आवाहनाला जुमानत नसल्याचे चित्र गुरूवारीही शहरात होते. लॉकडाऊन आहे का असा प्रश्न शहरातील वातावरण पाहून पडत आहे.
कोरोनाला हरवायचे असल्यास सर्वांना घरातच थांबणे अत्यंत आवश्यक असून तशी स्थिती मात्र सध्या दिसत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत गर्दीवर नियंत्रण न मिळविल्यास कोरोनाचा संसर्ग कसा वाढेल केव्हा वाढेल हे सांगणे कठीण आहे. सध्या जळगाव जिल्हा ऑरेंज झोनमध्ये मोडत आहे. मात्र, सध्या एकही पॉझिटीव्ह केस नसल्याने जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करीत असून ही बाबत मोठी दिलासादायक आहे. मात्र, यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे.
चार संशयित रूग्ण दाखल
जिल्हा रूग्णालयात चार संशयित रूग्णांना गुरूवारी सकाळी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, एका सोसायटीत नाशिक येथून परतलेल्या एका युवकाला रात्री अचानक अस्वस्थ वाटत असल्याने या रूग्णाला कोरोनच्या संशयावरून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
केसरीराज लाईव्हचे आवाहन
सध्या स्थितीत गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हीच सर्वात मोठी सुरक्षितता आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांमध्ये एकमिटर पर्यंतचे अंतर राखणे होय. सर्दीसह ताप व खोकला असल्याशिवाय श्वास घ्यायला त्रास होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. हात वारंवार साबणाने धुवा. नाका तोंडाला वारंवार हात लावू नका, ही पथ्थे पाळल्यास आपण कोरोनाची लढाई जिंकू त्यामुळे प्रशासनाचे सूचनांचे पालन करावे असे आवाहन केसरीराज लाईव्हव्दारे आम्ही करीत आहोत.