१० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव;- जुन्या वादाच्या कारणावरून १० ते १५ जणांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश करून घरातील सामानांची तोडफोडकरून तरूणासह त्यांच्या आईला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शहरातील विवेकानंद नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, अलका विनोद कोचुरे (वय-५५) रा. विवेकानंद नगर ह्या मुलगा शुभम कोचुरे आणि कुटुंबियांसह राहतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून ८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दत्तू कोळी, विकी कोळी, भरत कोळी आणि इतर १५ अनोळखी व्यक्ती कोचुरे यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून हातातील काठ्या व लोखंडी रॉडने घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर व इतर सामानांची तोडफोड केली. त्याचप्रमाणे अलका कोचुरे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. मुलगा शुभम कोचुरे याला लाकडी काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले आणि दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेत अलका कोचुरे यांची ५० ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, १० ग्रॅम कानातील दागिने तुटून पडून नुकसान झाले आहे. याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता अलका कोचुरे यांनी तीन जणांसह इतरांविरोधात रामानंदनगर पोलीसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.