नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सुबेहा पोलीस ठाण्याच्या पंडित पुरवा गावात भयंकर घटना घडली. भाजपा नेत्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. घरापासून 20 मीटर दूर अंतरावर मृतदेह आढळला आहे. काही अज्ञात लोकांनी भाजपाच्या नेत्याची हत्या केली असून यामागे संपत्तीचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपा नेत्याच्या घरापासून काही अंतरावर गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाजपा नेत्याच्या पत्नीचं दोन महिन्यापूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे ते सध्या घरी एकटेच राहत होते. हरिहर सिंह असं 65 वर्षीय नेत्याचं नाव असून संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच त्यांच्या गळ्यावर काही खूणा सापडल्या. स्थानिक पोलीस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने याचा अधिक तपास करत आहेत.