जळगाव (प्रतिनिधी) – आईच्या दुधाचा मुलाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी खूप फायदा होतो. त्यासाठी स्तनपानाचे महत्व आहे. बाळाला योग्य रीतीने स्तनपान होणे हि केवळ मातेचीच जबाबदारी नव्हे तर कुटुंब आणि समाजाची देखील आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
राज्यभरात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह आयोजित होता. त्यानिमित्त जनऔषधवैद्यक शास्त्र विभागातर्फे रुग्णालयात स्तनपान जनजागृती कार्यक्रम व त्यानिमित्त पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद बोलत होते. प्रसंगी मंचावर उप अधिष्ठाता डॉ मारोती पोटे, जनऔषधवैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावस्कर, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास मालकर, अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते.
प्रस्तावनेतून डॉ. योगिता बावसकर यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट करीत स्तनपानविषयी महिलांना शास्त्रोक्त माहिती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, बाळासाठी स्तनपान खूप महत्वाचे आहे. बाळाच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीसाठी स्तनपान योग्य रीतीने व्हावे यासाठी परिचारिकांकडून मतांनी शास्त्रोक्त माहिती घ्यावी. स्तनपानाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन व आभार डॉ. गणेश लोखंडे यांनी मानले. यावेळी डॉ. डॅनियल साजी, डॉ. संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
पथनाट्यातून जनजागृती
प्रसंगी पीएनसी वॉर्डात आणि जनसंपर्क कक्षासमोर महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्तनपानाविषयी जनजागृती म्हणून पथनाट्य सादर केले. यावेळी त्यांनी बाळाला दूध कसे पाजावे, स्तनपानाविषयी गैरसमजुती तसेच स्तनपानाची आवश्यकता याबाबत माहिती दिली. यात प्रणव जाजू, शरयू बैकर, अंजली केंचकनवर, मयूर अहिरे, शफिक अन्सारी, सरिता देशमुख, अमृता गिरी, शमशाद गवळी, हर्षदा बदडे, दिव्या बुजाडे, अश्विनी दौड, प्रज्वल बोर्डे, स्वराज हरणे, अंकिता ढमढेरे यांनी सहभाग घेतला.