भंडारा (वृत्तसंस्था ) महाराष्ट्रासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.
भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. भंडाऱ्यात गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, अशी माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. 19 एप्रिल रोजी जिल्ह्यातील रिकव्हरी रेट घटून 62.58 टक्के होता. आता हा रिकव्हरी रेट वाढून 98.11 टक्के एवढा झाला आहे. तर 12 एप्रिल रोजी पॉझिटीव्हिटी रेट सर्वाधिक 55. 73 टक्के होता. तो आता घटून शून्य झाला आहे.