जळगाव (प्रतिनिधी) – जुने बी. जे. मार्केट येथे महापालिकेतर्फे थकीत भाडेपट्टी वसूल करण्यासाठी आज मनपाचे पथक पोलीस बंदोबस्तात हजर झाले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी वाढीव मुदत मागितली असता त्यांना शनिवारपर्यत मुदत वाढ देण्यात आल्याने पथक परतले.

महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील व उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेचे पथक जुने बी. जे. मार्केट येथे दाखल झाले. यावेळी ज्या गाळेधारकांनी त्यांच्याकडील थकीत भाडेपट्टी भरलेली नाही, किंवा ज्यांनी थकीत भाडेपट्टी कमी प्रमाणात भरली आहे अशा गाळ्यांना सील लावण्याच्या तयारीत मनपा पथक आले होते. यावेळी पथकाने प्रथम जे गाळे सील करावयाचे होते त्यांची पाहणी केली. पाहणी करत असतांना गाळेधारकानी त्यांना पैसे भरण्यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी उपायुक्त संतोष वाहुळे व उपायुक्त प्रशांत पाटील यांना केली. यावर महासुलचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी शनिवारपर्यंत मुदतवाढ दिली. यामुळे गाळेधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला.







