वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – हवामानावर आधारित फळ, पीकविमा योजनेत २०२०-२१ मध्ये परताव्यासंबंधीची परिमाणके किंवा परतावा निकष बदलल्याचा चांगलाच लाभ विमा कंपनी व संबंधीत घेण्याच्या स्थितीत आहेत. या योजनेत काही मंडळांमधील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी परताव्यांचा किरकोळ लाभ देण्यासाठी तापमान व इतर आकडेवारीत गडबड करण्यात आली आहे. योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी शरद जोशी प्रणित व रघुनाथ दादा राज्य शेतकरी संघटनेने केली आहे.

या योजनेत तापमानासंबंधी आकड्यांमध्ये गडबड करून फक्त भोकर, भालोद व अडावद या तीनच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी परतावे देण्यासाठी अनेकांना मॅनेज करण्यात आले असल्याचा, आरोप राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर यांनी केला आहे. गुर्जर यांनी याबाबत विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक समाधान पाटील व अधिकारी देवीदास कोळी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून आपले म्हणणे सांगितले. त्यात गुर्जर यांनी तापमानाचे आकडे मॅनेज करून भोकर व इतर मंडळांमधील काहीच शेतकऱ्यांना परतावे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. तसेच याबाबत सर्व बाबी बाहेर आणल्या जातील.
आंदोलन छेडू भोकर नजीकचे पिंप्राळा व यावलमधील इतर मंडळे, चोपड्यातील गोरगावले व इतर मंहसूल मंडळदेखील परताव्यांसाठी पात्र ठरायला हवे. भोकर येथे मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंश सेल्सीअस तापमान होते, त्याच वेळी अशी नोंद पिंप्राळा व गोरगावले येथील हवामान केंद्रात कशी झाली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला. किरण गुर्जर यांनी त्यावर हवामान केंद्र हे स्कायमेट कंपनीचे आहेत. आकडे शासन आम्हाला पुरविते. आपण ते माहितीच्या अधिकारात मागवा. आकडे चुकीचे असतील तर आमच्या कंपनीचे परतावे वाचतील, कंपनीलाच फायदा होईल, असे कंपनीचे कोळी यांनी किरण गुर्जर यांना मोबाईलवरून संवाद साधताना सांगितल्या. ह्या वर्षी विमा कंपन्यांना जवळपास 50 कोटी पर्यंत फायदा होण्याची शक्यता आहे असे किरण गुजर यांनी सांगितले.
यातच शरद जोशी संघटनेचे माजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कडूअप्पा पाटील यांनीदेखील विमा कंपनीच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही शेतकरी तुपाशी व काही उपाशी असा प्रकार होवू नये. विमा कंपनीला योजनेत सहभागी शेतकऱ्याने १५ हजार रुपये विमा हप्त्यापोटी दिले असतील तर त्याला किमान १२ हजार रुपये परतावा मिळायला हवा. कोविड, महागाईत शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशात शेतकऱ्यांची आकडे मॅनेज करून पिळवणूक करणे, निकष बदलून फसवणूक, लुबाडणूक करणे योग्य नाही. योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना परतावे दिले जावेत, असेही किरण गुर्जर व कडू अप्पा यांनी म्हटले आहे.







