नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील अपात्र

नगरदेवळा (प्रतिनिधी) – येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहात असल्याचे निदर्शनास आल्याने मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगाव यांनी सर्व पुराव्यांची तपासणी करत तक्रारदार दिपक विजयसिंग परदेशी (सोनू परदेशी ) यांच्या बाजूने निकाल देत सामनेवाला यांचा अर्ज अवैध ठरवत सदस्य पदावरुन अपात्र घोषीत केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सामनेवाला याने नगरदेवळा वार्ड क्र.२ मधून सर्वसाधारण प्रवर्गातुन निवडणूक लढविली होती. सदर व्यक्तिविरुद्ध तक्रारदार सोनू परदेशी याने ०२/०२ २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३ ) अन्वये शासकीय जागेवर अतिक्रमन करून राहत असून त्याला अपात्र करून अतिक्रमण काढण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे दाखल केली होती. यात सामनेवाला विलास पाटील याने नगरदेवळा येथील गट क्र. १३५ /१अ येथील सरकार नवीन गावठाण साठी संपादीत केलेल्या जागेवर बेकायदा अतिक्रमण केल्याने तसेच ग्रामपंचायत नमुना नं.८ मालमत्ता क्र. ३८६१ येथे दुमजली इमारत बांधलेले असल्याचे निदर्शनास येते. विषेश म्हणजे ग्रामविकास अधिकारी नगरदेवळा यांनी त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत लेखी स्वरूपाची नोटीस दिली होती तरीदेखील त्यांनी अतिक्रमण काढलेले नाही. तसेच त्यांनी अतिक्रमण करून राहत नसल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही. मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जळगांव यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यांनी अतिक्रमण केले असल्याचे सिध्द होते. या सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सदर सदस्याला शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याचे सिद्ध होत असल्याने अपात्र घोषित केले आहे.
तक्रारदार यांचेकडून अॅड. प्रल्हाद बी.पाटील यांनी तर सामनेवाला यांचेकडून अॅड. रणसिंग एस. राजपूत यांनी कामकाज पाहिले.







