मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेले मजूर व गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी पोलीस अधिकारी व जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांना सोमवारी (दि.१३) दूरध्वनीवरून दिले. येरवडा, वडगाव शेरी, नगर रस्ता, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी, धानोरी इत्यादी उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवेच्या नियोजनाअभावी गोरगरिबांचे हाल होत असल्याची बाब शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत गोऱ्हे यांनी तत्काळ दखल घेत परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी संवाद साधून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच उपनगरांतील किराणा, दूध, औषधे इत्यादी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सूरू ठेवण्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. ही दुकाने चालू ठेवण्याबाबत निर्बंध घालण्यात आले नाहीत, तरीही याबाबत नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे गोऱ्हे यांनी देशमुख यांना सांगितले. यावेळी पंकज देशमुख यांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरूच ठेवण्यात येतील. याबाबत पोलीस अधिकारी व व्यापाऱ्यांना सूचना देऊन संबंधित भागांमध्ये ध्वनिवर्धकावर (लाऊड स्पीकर) घोषणाही करण्यात येईल, असे सांगितले. तसेच ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याची बाबही उपायुक्त देशमुख यांनी मान्य केल्याची माहिती आनंद गोयल यांनी दिली. नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळण्यास अडचणी येत असल्यास, कुठल्याही बाबतीत नागरिकांची अडवणूक होत असल्यास तात्काळ पोलिसांशी अथवा पोलीस उपायुक्त देशमुख यांच्याशी संपर्क साधावा. तसेच गर्दी टाळण्यासाठी Lociv.com या ऍपवर किराणा, दूध, फळे, भाजीपाला आणि औषधे मिळवता येतील. अत्यावश्यक सेवा देणारेही या अॅप मध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी 18005726186 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पंकज देशमुख यांनी केले आहे. आनंद गोयल म्हणाले, शिवसैनिक आपत्तीमध्ये संकटसमयी नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध राहतील. नागरिकांना तातडीची मदत हवी असल्यास खलील क्रमांकावर संपर्क करावा. आनंद गोयल ९६६५११२३४५