जळगाव (प्रतिनिधी ) ;- येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांची गैरसोय होत असून ती टाळावी अशी मागणी होत आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात सध्या चारशेहून अधिक डॉक्टर शिक्षण घेत आहेत. दुपारी १ ते २ वाजेदरम्यान जेवणाची वेळ असते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेले नेत्र कक्षामध्ये अतिदक्षता विभाग उभारण्यात आला असून रुग्नांची सेवा करणाऱ्या एमबीबीएसच्या भावी डॉक्टरांना जेवणाला बसण्याची सुविधा नसल्याने त्यांना नेत्र कक्षाच्या आवारात जेवणाला बसावे लागत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून या भावी डॉक्टरांना जेवणाचा डबा खाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसावे लागत आहे. तसेच वाहने पार्किंगला लावण्यातही या डॉक्टर आणि आरोग्य सेविका यांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्या डॉक्टरांचे हाल होत असून त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. जेवणासाठी त्यांना आवारातच बसावे लागत असल्याने त्यांना रुग्नांपासून इन्फेक्शन अथवा कोरोनाची लागण होण्याची शक्यताही यामुळे वाढली आहे. एकीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उच्च दर्जाची सुविधा नागरिकांना उपलब्ध असली तरी तेथे कार्यरत आणि शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांचे प्रश्न कोण सोडविणार असा सवाल व्यक्त केला जात आहे.