हरीभाऊ जावळे मित्र परिवाराने डॉ.उल्हास पाटील यांच्याप्रती व्यक्त केले ऋण
जळगाव – ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ ही म्हण डॉ.उल्हास पाटील यांना तंतोतंत लागु पडते. राजकारणापलीकडे जाऊन नातेसंबंधातील ओलावा जपत माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी त्यांच्या हॉस्पीटलिटी मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेला हरीभाऊ जावळे यांचे नाव देऊन जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात एक आदर्श उभा केला असल्याचे गौरवोद्गार भालोद येथील हरीभाऊ मित्र मंडळाने व्यक्त केले.
राजकारणात फार काळ कुणी कुणाचा शत्रु किंवा मित्र नसतो. असे असले तरी राजकीय मर्यादा काटेकोरपणे पाळणारे अनेक जण आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील हरीभाऊ जावळे आणि डॉ.उल्हास पाटील हे राजकारणाचे दोन टोक असले तरी त्यांच्यात मैत्रीचा ओलावा अद्यापही कायम आहे, त्याची प्रचिती देखील माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कृतीतून अनुभवता आली आहे. हरीभाऊ जावळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या श्रद्धांजली सभेत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी त्यांच्या एका संस्थेला हरीभाऊ जावळेंचे नाव देणार असा शब्द दिला होता. हा शब्द पाळून अवघ्या वर्षभरातच डॉ.उल्हास पाटील यांनी हॉस्पीटलिटी मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेला हरीभाऊ जावळेंचे नाव देऊन प्रत्यक्ष कृती केली. म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीचा प्रत्यय डॉ.उल्हास पाटील यांच्या माध्यमातून तंतोतंत खरा ठरतो असे गौरवोद्गार हरीभाऊ जावळे मित्र मंडळाने भेटीप्रसंगी व्यक्त केले.
कर्ता तुम्ही, कॉलर आमची उंचावली
यावेळी हरीभाऊ मित्र मंडळातर्फे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन ऋणनिर्देशपत्र देत सत्कार केला. तसेच हरीभाऊ मित्र मंडळाचे सदस्य शशिकांत गाजरे यांनी शैक्षणिक विश्वाचे कर्ता तुम्ही असले तरी कॉलर आमची उंचावत असल्याचेही त्यांनी डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी हरीभाऊ मित्र मंडळाचे अरुण रामदास चौधरी, नारायण शशिकांत चौधरी, मिनल हरचंद्र जावळे, अण्णा जावळे, मुरलीधर त्र्यंबक इंगळे यांच्यासह डॉ.वैभव पाटील, डॉ.केतकी पाटील उपस्थीत होते.