नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, ट्विटरने आपल्या वेबसाइटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाखला आपल्या वेबसाइटवर दोन स्वतंत्र देश म्हणून दाखवले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘ट्विटर’ने आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचे समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशात ‘ट्विटर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजरंग दलाच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून बुलंदशहरात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर, ट्विटरने हा चुकीचा नकाशा काढून टाकला आहे. ‘ट्विटर इंडिया’च्या व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०५ (२) आणि आयटी अधिनियम २००८ च्या कलम ७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.