जळगाव ;- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी दाेन दिवसांपूर्वी ट्विट केले होते. या पार्श्वभूमीवर ट्विटरवर राेहिणी खडसे यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अपशब्द व आक्षेपार्ह टीका केली. याप्रकरणी नाथ फाउंडेशनने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून संबंधित अकाउंटधारकावर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अॅड. खडसे यांनी २४ जून रोजी सकाळी ११ वाजता ‘भाजपला ओबीसींचा कधीपासून कळवळा आला. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता, आता गळा काढण्यात काय अर्थ?’ असे ट्विट केले होते. त्या ट्विटवर सपोर्ट यूथ ऍक्ट नगमा २१६ या अकाउंटवरून माजी मंत्री खडसे व अँड. खडसे यांच्याविषयी अपशब्द वापरून आक्षेपार्ह टीका केली आहे. त्या व्यक्तीने खडसे कुटुंबीयांविषयी वापरलेल्या शिवराळ भाषेबद्दल नाथ फाउंडेशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नाथ फाउंडेशनतर्फे अशोक लाडवंजारी, सुनील माळी, सुहास चौधरी, अमित वाणी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.








