शेतकर्यांना पालकमंत्र्यांनी थेट बांधावर जाऊन वाटले खत
जळगाव ;- बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यालाच केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल केली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजीत कृषी संजीवनी उपक्रमाच्या उदघाटनपर कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकर्यांना बांधावर खत वाटप करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद अमराबाद फार्म या ठिकाणी कृषी संजीवनी योजनेता शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ना. पाटील यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन बीज प्रक्रिया व रुंद सरी-वरंबा पद्धतीचे यंत्राची परिपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र च्या शास्त्रज्ञांनी उपस्थित असलेल्या शेतकर्यांना याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने या वेळी आसोदा भादली बु. येथील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषिभूषण शेतकरी अनिल सपकाळे, भादली बु. येथील सरपंच मिलिंद चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळ असोदा चे शेतकरी किशोर चौधरी उपस्थित होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते रुंद सरी वरंबा पद्धतीचे व्हिडिओचे अनावरण करून माहिती दिली. तसेच संभाजी ठाकूर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव) यांनी कृषी संजीवनी सप्ताह मध्ये घेण्यात येणार्या कार्यक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर व शेतकर्यांना माहिती दिली. यावेळी इफको कंपनीमार्फत नॅनो युरिया बाबतची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली तसेच सदरील उपलब्धता आपल्या जिल्ह्यात पुढील महिन्यापासून होईल असे कळविण्यात आले.
या कार्यक्रमास अनिल भोकरे (कृषी उपसंचालक जळगाव), कुर्बान तडवी (उपविभागीय कृषी अधिकारी जळगाव) श्रीकांत झांबरे (तालुका कृषी अधिकारी जळगाव), संजय पवार (तंत्र अधिकारी पोकरा,जळगाव) कृषी विभागातील अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.