मुंबई (वृत्तसंस्था ) ;- राज्य कोरोना लाटेतून सावरत असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट डेल्टा प्लस विषाणूमुळे येऊ शकते असा अंदाज बांधला जात असतानाच रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिह्यांतून घेतलेल्या नमुन्यांत SARS-COVed-2 हा डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. सात रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून अधिक नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिह्यात गावागावांत नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱया जिह्यांमध्ये हा जिल्हा मोडतो. रत्नागिरीबरोबरच मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई, पालघर जिह्यांतही रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट विषाणू आढळल्याने मुंबईकरांच्याही चिंतेतही भर पडली आहे.
हा म्युटंट स्ट्रेन परदेशातून संक्रमित झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या गावांत हे रुग्ण सापडले ती गावे सील करण्यात आली आहेत. या गावांमध्ये परदेशातून नागरिक ये-जा करतात. त्यामुळे परदेशातून येणाऱया नागरिकांमधून हा स्ट्रेन संक्रमित झाल्याचा अंदाज वरिष्ठ आरोग्य अधिकाऱयांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
‘ डेल्टा प्लस ‘ ला गांभीर्याने घ्या – डॉ. रणदीप गुलेरिया
कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूला गांभीर्याने घ्या. जर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे योग्य पालन केले नाही तर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढेल. हा विषाणू स्वतःला वाचविण्यासाठी आपले स्वरूप बदलत आहे. याआधी हिंदुस्थानात डेल्टा विषाणूचे संसर्गित रुग्ण आढळून आले होते. पुन्हा या विषाणूने आपले स्वरूप काही प्रमाणात बदलले असून हा डेल्टा व्हायरसपेक्षाही अधिक वेगाने संसर्ग पसरवू शकतो. त्यामुळे तिसऱया लाटेचा धोका संभवत असून याबाबत गांभीर्याने पावले उचलावी लागतील, असा इशारा दिल्लीतील एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.