जळगाव (प्रतिनिधी) – मनपाच्या शहरातील 16 मार्केटमधील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले असून या उपोषण स्थळी दररोज मार्केटमधील व्यापार्यांकडून वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. एका दिवशी अर्धनग्न आंदोलन, एका दिवशी थाळीनांद आंदोलन तर, शनिवारी घंटानांद आंदोलन करण्यात आले. या आदोलनाच्या माध्यमातून गाळेधारकांना न्याय मिळावा व गाळेधारकांसदर्भात घेण्यात येत असलेले अन्याय कारक धोरण मागे घेण्यात यावे, अशी आर्त हाक रविवारी गाळेधारकांच्या कुटुंबातील महिलांनी प्रशासनाला दिली आहे
शनिवारी आंदोलक महिला म्हणाल्या की, आधीच लॉकडाऊनमुळे लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. व्यवसाय खूप कमी झालेला आहे. अगदी दिवसाला दोन-तीनशे रूपये मिळणे देखील कठीण झालेले आहे. यातच महापालिका प्रशासन आता गाळेधारकांना वेठीस धरत आहे. आमचा व्यवसाय होत नसतांना गाळ्यांसाठी तगादा लावणे, लिलावाची धमकी देणे या बाबी गैर आहेत. आता आम्ही आणि आमच्या कुटुंबाने जगावे तरी कसे ? आम्हाला खायला तरी मिळणार का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. भास्कर मार्केट, शामाप्रसाद मुखर्जी मार्केट आणि इतर मार्केटमधील गाळेधारकांच्या कुटुंबातील महिला यात सहभागी झाल्या होत्या.