नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १,०३५ रुग्णांची वाढ झाली असून ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबतची अधिकृत आकडेवारी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आली असून देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७,४४७ वर जाऊन पोहोचली आहे.देशभरामध्ये आतापर्यंत ६४२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या ४० मृत्यूमुळे देशातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या एकूण २३९ एवढी झाली आहे.तत्पूर्वी, काल जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत सर्वाधिक ८९६ रुग्ण वाढले होते. दुर्दैवाने कोरोनाचा आलेख गेल्या २४ तासांमध्ये देखील चढाच राहिला असून आजच्या आकडेवारीनुसार १०३५ रुग्ण वाढले आहेत. कोरोना रुग्ण संख्येमध्ये एक हजार अथवा त्यापेक्षा जास्त रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे.