चाळीसगाव;- महाराष्ट्र शासनाने 7 मे रोजी अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे नोकरीतील पदोन्नती आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहेत. आरक्षणानुसार त्यांना तात्काळ पदोन्नती मिळावे यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुगल मिटद्वारे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत संपूर्ण राज्यात एकाच दिवशी महासंघाच्यावतीने आंदोलन करणेबाबत निर्णय झाला. सदर बैठकीमध्ये महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, कार्याध्यक्ष रवींद्र पालवे .वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांच्यासह विविध जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी सर्व विभागीय अध्यक्ष व सांगली जिल्ह्यातील विविध शाखेचे जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते अशी माहिती नाशिक विभागीय कार्याध्यक्ष तथा शिक्षक संघटनेचे राज्य अति सरचिटणीस प्रभाकर पारवे यांनी सांगितले.
राज्यात मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांची सुप्रीम कोर्टात पदोन्नती आरक्षणबाबत विशेष अनुमती याचिका प्रलंबित असताना महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 मे 2021 रोजी अध्यादेश काढून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलले आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी काष्ट्राईब कर्मचारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. त्यास अनुसरून आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची 26 जून 2021 रोजी जयंती आहे. 26 जून 1902 साली सदर दिवसी मागासवर्गीय समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण बहाल केले आहे. हा दिवस आरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व औचित्य साधून मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांचे डावलले नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणा संदर्भातील शासन निर्णय रद्द करून पुन्हा पदोन्नतीमधील आरक्षण देणेबाबत सुधारीत आदेश काढणेबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आग्रही आहे. त्यासाठी काष्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने 25 जून 2021 रोजी विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,व तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, व उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष मागासवर्गीय पदोन्नती उपसमिती अजितदादा पवार, यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे, यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती महासंघाचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष तथा शिक्षक संघटनेचे राज्य अतिरिक्त सरचिटणीस प्रभाकर पारवे यांनी दिली.