नवी मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करून प्रशासन वेळोवेळी खबरदारी घेत आहे. तर नागरिकांना सतत घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे. अनावश्यक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांना तर चांगलाच चोप देत आहेत. असे सर्व कडक नियम असताना देखील पनवेल मधील एका लोकप्रतिनिधीनेचं या सर्व नियमांचे उल्लंघन करून मित्रांना गोळा करून आपला वाढदिवस साजरा केला आहे. सध्या पोलिसांनी या लोकप्रतिनिधीवर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:च्या घरी नगरसेवक अजय बहिरा यांनी बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत सेलिब्रेशन करत होते. पण या ठिकाणी पोलिसांनी अचानक धाड टाकली असता तिथे 11 जण उपस्थित होते. त्यांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. तसंच जमावबंदी असताना एकत्र येणे, मास्क न घालणे इत्यादी गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.