जळगाव ( प्रतिनिधी ) ;- शहरातील मेहरूण उद्यान परिसरातील जे.के.पार्क जवळ जलतरण तलावाच्या पाठीमागे सुरु असलेल्या जुगार अड्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल आठ वाजेच्या सुमारास जे.के.पार्क समोर असलेल्या काटेरी झुडूपात पत्याचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी ठिकाणी छापा टाकला यावेळी दिपक संजय हटकर (21) रा.श्रीकृष्ण नगर गवळीवाडा पाचोरा, जिभाऊ उत्तम हटकर (25) रा.गवळीवाडा तांबापुरा जळगाव यांना जागीच पकडण्यात आले. दरम्यान टिनु गोसावी आणि भिला हटकर (रा. गवळीवाडा तांबापुरा जळगाव) हे पळून जाण्यात यशस्वी झाले.
चौघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पत्ते व रोख रकमेसह एकुण 30 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अल्ताफ पठाण, गफ्फार तडवी, सतीष गर्जे, मुकेश नेरकर, लुकमान तडवी, इमरान बेग यांनी केली.