जळगाव ( प्रतिनिधी ) ;-जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि आता महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक असणारे विजय सिंघल यांच्या बनावट फेसबुक अकाउंटद्वारे पैशांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी यांच्याकडे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून विधी अधिकारी याबाबत सायबर सेलला तक्रार करणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील विधि अधिकारी असलेले अँड. हरुल देवरे यांना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तत्कालीन जिल्हाधिकारी आणि महावितरणचे सध्या असलेले कार्यकारी संचालक विजय सिंघल यांच्या नावाने फेसबुक अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर अँड. हरुल देवरे यांना मेसेज आला. कसे आहात , काय चालू आहे वगैरे औपचारिक संभाषण झाल्यानंतर आपण फोन पे युज करता का ? पैशांची गरज आहे. अशी विचारणा झाली . यावर एवढा मोठा व्यक्ती आपल्याकडे पैसे कसे काय मागू शकतात याबाबत अँड. हरुल देवरे यांना शंका आल्यानंतर त्यांनी ओळखपत्राची मागणी केल्यानंतर समोरच्या अनोळखी इसमाने संभाषण बंद केले. याप्रकाराबाबत अँड. हरुल देवरे हे जिल्हा सायबर सेलला तक्रार देणार असल्याचे त्यांनी केसरीराजशी बोलतांना सांगितले. दरम्यान अँड. हरुल देवरे यांनी कुठल्याही राजकीय व्यक्ती , प्रशासकीय अधिकारी , यांच्या अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर कुणाकडून तरी पैशांची मागणी झाल्यास ते बनावट अकाउंट समजून याबाबत तक्रार करावी असे आवाहन केले.