जळगाव ;- विविध मागण्यांसाठी आजपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे काळ्या फिती लावून कामकाज सुरु करण्यात आले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि ०४ हजार गटप्रवर्तक गेल्या १० ते १२ वर्षांपासून कार्यरत आहेत.आशा स्वयंसेविकांना सुमारे ८० पेक्षा जास्त विविध प्रकारची कामे करावी लागतात.त्याबदल्यात त्यांना कामानुसार मोबदला अदा केला जातो तर गटप्रवर्तकांना दरमहा प्रवासभत्ता म्हणून ७५००/- ते ८२००/- रूपये अदा केले जातात.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमुळे घराघरांत आरोग्य सेवा पोहचली.शिवाय कोरोनाच्या महामारीत जिवाची पर्वा न करता शासनाच्या तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनासंबंधित सर्व कामे आघाडीने करीत आहेत.
असे असतांनाही शासन त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे म्हणून आशाताई आणि गटप्रवर्तकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी आजपासून मागण्या मान्य होईपर्यंत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे.सदर आंदोलन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी १०० टक्के भागीदारी केली आहे.
आंदोलनाच्या धर्तीवर प्रलंबित मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केले.यावर जिल्हाधिकारी यांनी आपले निवेदन शिफारशीसह शासनाकडे सादर केले जाईल.असे आश्वासित केले.शिष्टमंडळात भागिरथी पाटील,उषा पाटील,भारती तायडे, सुनंदा पाटील, कल्पना भोई,कुर्शाद तडवी, ललिता पाटील,विजया जाधव,करुणा कुमावत,पुनम सपकाळे, धनश्री वाघुळदे, बेबी राऊत,यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी भागिदारी केली.








