जळगाव ;- मुक्ताईनगर येथे आज संत श्री मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र मुक्ताई नगर ते श्री क्षेत्र पंढरपूर या आषाढी वारीचे आयोजन करण्यात येते . आज सोमवार १४ जून रोजी संत मुक्ताबाई पालखी सोहळा भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला . पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी सोमवारी पहाटे संत मुक्ताईंची महापूजा, काकडा आरती झाली. सकाळी किर्तनसेवा पार पडली.
त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यावर्षी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा कोथळी, मुक्ताईनगरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघी मुक्ताईनगरी दुमदुमली होती. दरम्यान, परंपरेनुसार जुन्या मंदिरातून निघालेली मुक्ताई पालखी नवीन मंदिरात १८ जुलैपर्यंत मुक्कामी असेल. त्यानंतर १९ जुलै रोजी सकाळी बसने पंढरपूरला निघेल.
यावेळी संत मुक्ताबाई पालखीचे पूजन आणि दर्शनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे,,आ. चंद्रकांत पाटील,राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे यांच्यासह वारकरी , भाविक उपस्थित होते.
श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथून भीमातीरावरील विठूरायाचे भेटीसाठी आषाढी वारीतील मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखी. या पालखीचे प्रस्थान आज जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी- मुक्ताईनगर येथून मोजक्या भाविकांचे उपस्थितीत झाले.
आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची ३१२ वर्षापासूनची परंपरा आहे. कोरोनामुळे शासनाकडून जनतेच्या हिताकरिता निर्बंध घातल्याने वारी पायी न जाता बसने होत आहे. यावर्षी सुध्दा कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांचे प्रमाणभूत संताचे दहा मानाच्या पालख्यांना मान्यता दिलेली आहे.