नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नोएडा पोलिसांनी चोरांच्या टोळीतल्या 6 अट्टल चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेल्या साडे सहा लाख रुपयांचे सोने, आणि 57 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.
नोएडा सेक्टर 39 पोलिसांना सदरपूर सोम बाजार जवळ काही संशयित उभे असल्याची खबर मिळाली होती. त्यांच्याकडे कोट्यावधींचे सोने आहे, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून राजन भाटी व अरुण यांच्याजवळून 1-1 किलो सोन्याचे बिस्किटे आणि रोकड जप्त केली. चौकशीदरम्यान त्यांनी आणखी सहा साथीदारांची नावे सांगितली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर 2020 रोजी सूरजपूरच्या सिल्व्हर सिटी सोसायटीमधील एका फ्लॅटमधून आठ चोरट्यांनी कोट्यावधी रुपयांचे सोने आणि रोकड चोरली. पकडलेल्या दोन चोरट्यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी जयसिंग, नीरज, अनिल आणि बिंटू शर्मा यांना सेक्टर 81 मधून अटक केली आहे.
या सर्व टोळीतील चोरट्यांकडून पोलिसांनी 13.9 किलो सोने, 1 कोटी 10 लाख रुपयांचे जमिनीची कागदपत्रे, तसंच 57 लाखांची रोकड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत बाजारात 6.55 कोटी रुपये सांगितली जात आहे. आरोपींकडून पोलिसांनी जवळपास सुमारे 8.25 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ही संपत्ती देखील बदमाशांनी चोरीच्या पैशांनी खरेदी केली होती.
या चोरट्यांनी ज्याच्या घरात दरोडा टाकला त्या व्यक्तीच्या नावे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.चोरीच्या पैशातून या भामट्यांनी एक व्हिलाही विकत घेतल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. ज्या चोराच्या घरात चोरी झालीय, त्याचीही या प्रकरणात कसून चौकशी होणार आहे.
ज्याच्या घरात चोरी झालीय तो पोलिसांतही जाऊ शकत नाही. जर पोलिसांत गेलो तर आपणच पकडलो जाऊ, या भितीने तो पोलिसांत गेला नाही. तो व्यवसायाने वकील आहे, असं दुसऱ्यांना सांगत होता. घरातून कोट्यावधी रुपयांची चोरी झाल्यावरही त्याने चोरीची पोलिसांत तक्रार केली नाही, असं पोलिसांनी सांगितलं. तो एका टोळीशी संबंधित असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.