अलिबाग (प्रतिनिधी ) ;- गळीत हंगाम सन २०२०-२०२१ मध्ये चाळीसगाव तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस मोठ्या प्रमाणात मालेगाव तालुक्यातील एस जे शुगर, रावळगाव येथे दिला होता. मात्र गेल्या ५ महिन्यांपासून या शेकडो शेतकऱ्यांचे अंदाजे १५ कोटीच्या जवळपास ऊसाचे थकीत देयके रावळगाव येथील एस.जे.शुगर फॅक्टरी यांच्याकडे प्रलंबित आहेत. अनेकदा विनंती करून देखील कारखाना प्रशासनाने थकीत देयके देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन आपली अडचण मांडली होती त्यावेळी आमदार चव्हाण यांनी कारखाण्याचे मालक व शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते आमदार भाई जयंत पाटील यांना फोन करून शेतकऱ्यांची व्यथा सांगितली होती. मात्र त्यानंतर देखील शेतकऱ्यांचे थकीत देयक अदा न करण्यात आल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी अलिबाग येथे जाऊन निवडक शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह आमदार भाई जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व देयके थकीत असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह भाजपाचे माजी प्रदेश पदाधिकारी उध्दवराव माळी सर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव बापू पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, टाकळी विकासोचे माजी चेअरमन रोहन सूर्यवंशी, माळशेवगे येथील शेतकरी राम पाटील आदी उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी भाई जयंत पाटील यांना चाळीसगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांची सद्यस्थिती अवगत केली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे ऊसाचे एकुण प्रलंबित देयके व १८% व्याज यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना तातडीने देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असतानाही आजतागायत रावळगाव कारखान्याने देयके अदा केलेले नाही. त्यामुळे ऊसाची थकबाकी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने शेतकर्यांसची शेती, शेतीची तयारी यामध्ये अडचणी येत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरी लग्न आणि इतर खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मागील ३ वर्षांपासून सातत्याने होणारी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत हलाखीची झालेली असुन कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेकडो शेतकर्यां ची ऊस बिले साखर कारखान्याने थकविल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरी टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने कोणतीही विपरीत घटना घडू शकते, तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मलादेखील एस जे शुगर कारखान्याच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचे आमदार चव्हाण यांनी जयंत पाटील यांना सांगितले.
आमदार चव्हाण व शेतकरी प्रतिनिधी यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी तुमचे म्हणणे रास्त असून मीदेखील शेतकरी नेता आहे, मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे शेतकऱ्यांचे देयके देण्यास उशीर झाला मात्र आपणा सर्वांनी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था मांडल्यानंतर मी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष देणार असून येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांचे थकीत देयके अदा करतो असे त्यांनी आश्वस्त केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केवळ आश्वासन न देता थेट कृतीतून त्यांच्यासाठी धावून जाणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्याप्रति शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान…
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केवळ भाषणं देऊन व गोड बोलून बघतो करतो नाही तर ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणारे आमदार म्हणून मंगेश चव्हाण यांची ओळख आहे. चाळीसगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत देयकांसाठी थेट अलिबाग गाठून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपला शेतकरी बाणा सिद्ध केला आहे. आमदार चव्हाण यांच्या भूमिकेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
कोट्यावधींची देयके थकल्याने शेतकरी अडचणीत, आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याने लवकरच प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा – शेषराव पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य व प्रगतीशील शेतकरी कोदगाव
गेल्या अनेक वर्षांपासून कोदगाव व परिसरात नगदी पिक म्हणून उसाचे उत्पन्न घेतले जाते. यावर्षी मी ३५० टन ऊस व कोदगाव परिसरातील तसेच चाळीसगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपला लाखो टन उस रावळगाव कारखान्याला दिला. परिसरातील कारखाना असल्याने चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती मात्र उस देऊन ५ महिने झाले तरी देयके अदा न करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे पुढील सर्व अर्थचक्र बिघडले. अनेकदा मी स्वतः शेतकऱ्यांसह कारखाना प्रशासन व शासन दरबारी पाठपुरावा केला मात्र तरी थकीत देयके न मिळाल्याने शेवटी चाळीसगाव तालुक्याचे शेतकऱ्यांचे कैवारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे हा प्रश्न सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांना मांडावा लागला. आमदारांनी देखील केवळ आश्वासन न देता आम्हा शेतकरी प्रतिनिधी यांची थेट कारखान्याचे मालक यांच्याशी भेट घडवून आणून त्यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली व येत्या १५ दिवसात थकीत देयके अदा करण्याचे आश्वासन देखील त्यांच्याकडून घेतले याबद्दल सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व कोदगाव येथील शेतकरी शेषराव पाटील यांनी दिली. तेदेखील आमदार चव्हाण यांच्यासोबत अलिबाग येथे जयंत पाटील यांच्यासोबत भेटीसाठी गेलेल्या शेतकरी प्रतिनिधी मध्ये सहभागी होते.