मुंबई (वृत्तसंस्था ) ;- राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान खात्याकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच, मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे.

दरम्यान, मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याचे दिसत आहे. यासह इतरही अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरल्यामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.







