महापालिकेला उप सचिवांचे आदेश प्राप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव महानगरपालिकेच्या कायम अधिकारी आणि कर्मचाऱयांना ७ वा वेतन आयोग लागू झाला असल्याचे पत्र मनपा आयुक्तांना आज ८ रोजी प्राप्त झाले असून तसे आदेश उप सचिव शंकर जाधव यांनी काढले आहेत .
या आदेशात म्हटले आहे कि, महापालिकेच्या कायम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत आपल्या संदर्भ क्रमांक ४,५,६,व ७ च्या पत्रान्वये प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. यासह शासनाचे नियम आणि अटी लागू राहणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
वाढत्या महागाईमुळे मनपा कर्मचाऱ्यांना ७ वेतन आयोग लागू करण्याची मागणी महापौर जयश्रीताई महाजन यांनी ठाण्यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती. कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उप सचिवांनी तसे आदेश आज काढले आहेत. उपमहापौर कुलभूषण पाटील ,विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, आदी त्यावेळी उपस्थित होते . दरम्यान ७ वा वेतन आयोग लागू होण्यासाठी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी , अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनीही पाठपुरावा केला होता.