जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या जबर मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू आणि उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे जखमी होण्याच्या घटनेची गंभीर दखल मी घेतली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. राणे यांचे सुपुत्र शुभम राणे यांच्याशी मी आज फोनवर बोलून त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. राणे कुटूंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मयत राणे यांच्या कुरुंबियांशी फोनद्वारे संवाद साधून दिले .
तसेच ऊर्जामंत्री यांनी सांगितले कि, उप कार्यकारी अभियंता धामोरे यांच्याशी ही मी फोनवर संवाद साधून दिलासा दिला. माझ्याशी बोलताना धामोरे यांनी सर्व सबस्टेशनवर सीसीटीव्ही लावण्याची विनंती केली. त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. पीडित कुटुंबाची भेट घेऊन या विषयावर प्राथमिक माहिती घेण्याच्या व पुढील कारवाई करण्याच्या सूचना मी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिले आहेत. ते लवकरच महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडखे यांना जळगावमध्ये पाठवणार आहेत. पिडीत कुटुंबातील सदस्य आणि सर्व संबंधितांशी बोलून ते आपला अहवाल माझ्याकडे सादर करतील. हा अहवाल मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करून या प्रकरणी सखोल तपासासाठी विनंती मी करणार आहे. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्याची विनंतीही मी करणार आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही मी देतो.असे त्यांनी यावेळी सांगितले.