मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान उद्या दिल्ली येथे भेट होणार असल्याचे वृत्त आल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार याबाबतची उत्कंठा सर्वांनाच लागून राहिली होती.

राज्यातील करोना परिस्थिती, लसीकरण मोहीम, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांपैकी कोण-कोणत्या मुद्द्यांवर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु होती. अशातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, पंतप्रधानांसोबतच्या भेटीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेईल.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ राज्यातील मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच तौक्ते चक्रीवादळानंतर झालेले नुकसान व केंद्राची मदत याबाबत चर्चा करेल.
दरम्यान, वळसे-पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे आज दुपारपासून या भेटीबाबत राजकीय वर्तुळामध्ये सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्री यांच्याखेरीज आणखी कोणते नेते या शिष्टमंडळाचा भाग असतील याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.







