नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. तसेच अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशवासियांशी संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे. मोदी कोणत्या विषयावर देशवासियांशी संवाद साधणार हे मात्र ट्विटमध्ये नमूद करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच कोरोना बळींची संख्याही नियंत्रणात आली आहे. मात्र, अजूनही अनेक राज्यात कोरोना लसीकरण सुरू झालेलं नाही. लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण थांबलं आहे. या पार्श्वभूमीवर मोदी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक राज्यांनी नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये जनजीवन सुरळीत सुरू झालं आहे.
कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी सातत्याने संपर्क साधला आहे. देशवासियांसह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही त्यांनी वारंवार संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्याशिवाय देशातील डॉक्टरांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून कोरोना संकट रोखण्यासह त्यांना येणाऱ्या अडचणींवरही चर्चा केली आहे. मध्यंतरीच्या काळात आत्मनिर्भर पॅकेजचीही घोषणा करण्यात आली होती.