मुंबई (वृत्तसंस्था) –चेहऱ्यावर मास्क न लावता अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्याने चाललेल्या सात नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. चिखली पोलिसांनी कुदळवाडी परिसरात गुरुवारी ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व नागरिकांना कोणत्याही कारणास्तव रस्ता, हॉस्पिटल, कार्यालय, बाजारपेठ, खाजगी किंवा शासकीय वाहनाने वाहतूक, प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. चेहऱ्यावर मास्क न लावता फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश पोलिसांना दिले आहेत.चिखली पोलिसांनी गुरुवारी कुदळवाडी परिसरात मास्क न लावता फिरणाऱ्या सात नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे नागरिक अत्यावश्यक सेवा पुराविणाऱ्या यंत्रणेतील होते. मात्र, मास्क लावणे सर्व विभागातील नागरिकांना बंधनकारक करण्यात आल्याने ही कारवाई केली जात आहे.