नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने, सध्याच्या खडतर काळात करोनाबाधितांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हरयाणा सरकार दुप्पट पगार देणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख, राज्यातील काही प्रमुख डॉक्टर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी ही घोषणा केली. याआधीही खट्टर सरकारने करोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांपासून १० लाखांपर्यंतच्या वैद्यकीय विमा सुरक्षेची घोषणा केली होती. सध्याच्या खडतर परिस्थितीत डॉक्टर हे देवासारखे आहेत आणि आपल्या जिवाची पर्वा न करता ते करोना विषाणूशी लढा देत आहेत. यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचं खट्टर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. हरयाणात आतापर्यंत १५४ लोकांना करोनाग्रस्त रुग्ण सापडले असून दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.