मुंबई (वृत्तसंस्था) – रहस्यमय आणि अतिशय गुंतागुंतीच्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे गुढ अद्यापही कायम आहे. मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झाला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषारीद्रव्य आढळले नसल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून हिरेन हत्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. यापूर्वी देखील हिरेनचा शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा झाला होता. हिरेनचा शवविच्छेदनाचा अहवाल NIA च्या टीमकडे आला होता. हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यांच्या फुफ्फुसात खाडीतील पाणी आढळल्याचे रिपोर्टमध्ये झाले आहे. पण त्यांचा मृत्यू कसा झाला हे मात्र अद्याप समोर आले नाही.
मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसेच चेह-याच्या डाव्या नाकपुडीजवळ दीड सेंटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खूण आढळली आहे. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचेही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. हिरेन यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल सवाल उपस्थित केला होता.