मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्राचे राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नेते नाहीत तर राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत याचे भान विरोधी पक्षनेत्यांनी ठेवायला हवे. मात्र विरोधी पक्षाची जास्त ऊठबस राजभवनावर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून भाजप पक्षासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत ‘राजभवनाची लढाई’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून सडेतोड टीका करण्यात आली आहे. देशांतील काही राज्यांतील राज्यपाल लोकनियुक्त सरकारला डावलून परस्पर प्रशासनाला आदेश देत आहेत. त्यामुळं समन्वयात अडचणी येऊ शकतात, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडंच पंतप्रधान मोदींकडं केली होती. त्याच विषयावर भाष्य करताना आजच्या अग्रलेखातून टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अधूनमधून राजभवनावर जातात व सरकार कोरोनासंदर्भात ढिले पडले आहे अशी तक्रार करतात. वास्तविक अशा तक्रार करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाविषयी राज्यातील जनता काय म्हणते ते समजून घ्यायला हवे. महाराष्ट्राच्या राजभवनातील प्रतिष्ठा आणि पावित्र्य कायम राहावे असे वाटणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. राज्यपाल हे घटनेचे पालन करणारे आहेत. कालच्या पहाटे काय झाले तो विषय चघळत न बसता आम्ही महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे एक मार्गदर्शक म्हणून पाहतो. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. संसदीय क्षेत्राचा त्यांचा अनुभव आणि व्यासंग मोठा आहे. त्यांच्याही भावना महाराष्ट्राचे राज्यपाल समजून घेतील. राजभवनाची लढाई हा आमच्यासाठी तरी मुद्दा नाही. आज सगळ्यांचे प्राधान्य कोरोनाविरुद्धच्या लढाईला असायला हवे. कोरोनाविरुद्ध सगळ्यांनाच लढायचे आहे. कोरोनाला संपवायचे आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हे कार्य सिद्धीस नेणे हीच काळाची गरज आहे.