नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी प्रभावी औषधाची जगभरात शोधाशोध सुरू आहे. कोरोनावर ‘डायएबीझेडआय’ या औषधाचा एकच डोस पुरेसा ठरू शकतो, असा दावा अमेरिकन शास्त्रज्ञांकडून केला जात आहे.
‘डायएबीझेडआय’ या औषधामुळे कोरोना व्हायरसला गंभीर स्वरूपात जाण्यापासून रोखता येऊ शकते. तसेच हे औषध इतर श्वसनासंबंधी उपचारासाठीही फायदेशीर आहे. हे औषध शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमतेला सक्रिय करते. अमेरिकेतील शास्त्र्ाज्ञांनी यासंदर्भात केलेले संशोधन ‘सायन्स इम्युनोलॉजी जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी अनेक औषधांचे परीक्षण करण्यात आले. त्यात ‘डायएबीझेडआय’ हे औषध प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. हे औषध श्वसनमार्गातील पेशींमध्ये रोगप्रतिकारक प्रणाली ऑक्टिव्ह करू शकते आणि कोरोना संक्रमणाला गंभीर होण्यापासून रोखते. सध्या या औषधाची कॅन्सरवरील उपचारासाठी क्लिनिकल ट्रायलही सुरू आहे.
सार्स-कोविड-2 आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी ऑण्टिव्हायरल विकसित करण्याची तत्काळ गरज आहे. या व्हायरसमध्ये एकामागोमाग एक खतरनाक रूप समोर येत आहेत. ‘डायएबीझेडआय’ हे औषध एकाच डोसमध्ये प्रतिकारक क्षमता सक्रिय करते. त्यामुळे व्हायरस नियंत्रणात राहण्यास मदत होते, असे अमेरिकेतील पेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक सारा चैरी यांनी सांगितले.