मुंबई (वृत्तसंस्था) – रत्नागिरीमध्ये आणखी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही 5 झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वी साखरतर या गावातील जी महिला कोरोनाबाधित आढळून आली होती. त्याच महिलेच्या जावेला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित महिलेच्या घरातील 14 जणांचे रिपोर्ट हे तपासणीकरता पाठवण्यात आले होते. पैकी एकाचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, साखरतर या गावातील महिला कोरोनाबाधित आल्यानंतर आता गावचा परिसर हा 3 किमीपर्यंत सील करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला सर्व कोरोनाबाधितांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्या कोरोनाबाधिला डिस्चार्ज दिल्याची बातमी जिल्ह्याकरता आनंदाची असताना आता आणखी एक कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यानं आरोग्याच्या दृष्टीचं रत्नागिरीकरता चिंता वाढवणारी अशीच आहे. दरम्यान, या साऱ्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.