अहमदनगर (वृत्तसंस्था) –| कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यातच आता राज्यातल्या अहमदनगरमध्ये मे महिन्यात जवळपास 8 हजारहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे अहमदनगर नगर मध्ये तिसरी लाट आली की काय अशी शक्यता निर्माण झाली असून भीतीचे वातावरण आहे.
लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. मे महिन्यात नगर जिल्ह्यातील लहान वयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8881 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. याबरोबरच जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नगर जिल्ह्यात मे महिन्यात 77 हजार 929 इतके कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 18 वर्षाखालील रुग्णांची संख्या 8881 इतकी आहे. 0 ते 1 वयोगटातील 85 रुग्ण, 2694 रुग्ण हे 12 वर्षापर्यंतचे आहेत, तर 18 वर्षापर्यंतच्या रुग्णांची संख्या 6102 इतकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्य सरकारने लहान मुलांसाठी स्पेशल कोविड वॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे. तिथे लहान मुलांसाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे. तसेच या स्पेशल कोविड वॉर्डमध्ये शाळा किंवा प्री-नर्सरी शाळांप्रमाणे वातावरण तयार करणार आहे.