मुंबई (वृत्तसंस्था) – चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. यानंतर भाजप कडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बार धार्जिणे शरद पवार लक्षद्वीप मधे गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी प्रयत्न करतात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपुरातील दारूबंदी उठवतात. ‘गोमांस आणि दारु’ ही प्राथमिकता असलेले ‘पवार-ठाकरे’ हे साधु-संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहणच ! देवा,माझ्या महाराष्ट्राला लवकर मुक्त कर. अस ट्विट आचार्य तुषार यांनी केले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होतील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.







