मुंबई (वृत्तसंस्था) – देशात गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच बाबा रामदेव यांनी निरोगी राहण्यासाठी देशवासियांना अनेक उपदेश दिले. रामदेव यांनी पतंजलिची औषधं आणि योग करून कोरोनावर मात करणं शक्य असल्याचा दावा अनेकदा केला आहे. मात्र त्यानंतर त्यांनी अॅलोपॅथी औषध आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यानंतर मात्र देशभरातून त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेक डॉक्टरांनी तर बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींकडूनही रामदेव यांंच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.


अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकरने रामदेव बाबांना सोशल मीडियावरून फटकारलं आहे. उर्मिलाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट पोस्ट केलंय. ‘कुणीतरी या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आपल्या डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर्ससोबत २४ तास उभं रहा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, क्रोधास्पद आणि घृणास्पद आहे. हे कुणाचे टूलकिट आहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली?’ असं म्हणत उर्मिलाने रामदेव यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.







