वर्धा (वृत्तसंस्था) – लॉकडाउनच्या काळात शहरातील रस्ते लॉक आहेत. अशात मॉर्निंग वॉकची हौस पूर्ण करणाऱ्यांची मात्र गोची होत आहे. तरीही पहाटे शहरातील राम नगर, स्वावलंबी परिसर आणि सिंदी मेघे भागात मॉर्निंग वॉकची हौस पूर्ण करणाऱ्या 26 जणांवर कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सकाळी बाहेर पडणाऱ्यावर सायबर सेल कडून ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवली जात आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जिल्हयात एकही रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. परंतु, प्रशासन खबरदारीचे सर्व उपाय करीत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणा-यांवर ड्रोन कॅमे-याने लक्ष ठेवण्यात येत आहे. गुड मॉर्निंग नागरिकांसाठी बॅड मॉर्निंग ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाचे वतीने करण्यात आले आहे. पण या आवाहनाला न जुमानता नागरिक पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर निघत आहे. टेकडी परिसर , सर्कस ग्राउंड आणि स्वावलंबी ग्राउंड येथे सकाळी काही लोक एकत्र येत आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी पोलिसांनी कंबर कसलीय. सकाळी घराबाहेर पडणाऱ्या 26 जणांवर राम नगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.