जळगाव ( प्रतिनिधी) ;- वरणगाव येथील एका २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ११ ते ११:३० वाजेदरम्यान उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी विवाहितेचा पती , सासू आणि दीर या तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, सावदा येथील माहेर असलेल्या रुकसार बी शाहरुख खान वय २१ रा. अक्स नगर, वरणगाव हिचे दोन वर्षांपूर्वी शाहरुख याच्याशी लग्न झाले होते. आज सकाळी तिच्या राहत्या घरी रुकसार बी शाहरुख खान हिने ओढणीने गळफास घेतल्याची घटना सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती . तसेच तिला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्याने याठिकाणी गर्दी झाली होती . अखेर जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मयत विवाहितेचे शवविच्छेदन करण्यात आले.
पती शाहरुख उस्मान खान, दीर मुश्तकीन खान आणि सासू जोहराबाई खान या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तपास एपीआय संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील वाणी , पोलीस शिपाई भूषण माळी करीत आहे . दरम्यान मयत विवाहितेला ४ महिन्यांचा मुलगा आहे.