मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच, पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या कोकण दौऱ्याच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये विशेषतः मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही संधी साधत यावेळी मुख्यमंत्र्यांवर बोचरा निशाणा साधला.
नितेश राणे यांनी कोकण पाहणी दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचणारे एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात कि, ‘यालाच म्हणतात ‘lipstick’ दौरा..मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही..मोजून १० किमी आतच..विमानतळावरचा आढावा..दौरा संपला!!! ईथे..फडणवीसांचा ७०० किमीचा झंझावात..कोकण सब हिसाब करेगा. याद रखना शिवसेना!’, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. राणे आणि ठाकरे कुटुंब ह्यातला वाद काही महाराष्ट्राला नवा नाही. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या बोचऱ्या टीका करण्यासाठी संधी सोडली जात नाही हे स्पष्टच.
नितेश राणे यांनी यापूर्वी देखील कोरोनाचे महासंकट आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधता होता, ‘उद्धव ठाकरे सरकारची महाराष्ट्रातील दोन वर्ष. २०२० चक्रीवादळ (निसर्ग चक्रीवादळ), २०२१ (तौक्ते चक्रीवादळ). २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनाबळींमध्ये पहिल्या क्रमांकावर. हे पुढे सुरूच आहे. सगळं वाईटच घडत आहे. हे तर ग्रहणांचेही बाप आहेत, बॉस’, अशी अत्यंत घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली होती.